जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- शेतात लागवड केलेल्या पिकातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे या विवनचनेतून तालुक्यातील गोंडखेल येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोंडखेल येथील शेतकरी विश्वनाथ त्र्यंबक वाघ (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विश्वनाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा आहे. विश्वनाथ वाघ यांच्याकडे स्वतःच्या मालकीची पाच एकर जमीन होती. पावसाळ्यात शेतजमीन कसून पीक लागवड केली. परंतु अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या विश्वनाथ वाघ यांच्या समोरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला होता.
शेतातून पिकाचे चांगले उत्पन्न येईल व कर्जफेड करू याची आशा मावळली होती. यामुळे सावकारी व बँकांचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी आपल्या राहत्या घरात घरात कुणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.