पारोळा तालुक्यातील पिंप्री येथे सव्वा लाखांची चोरी
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंप्री प्र. ऊ. येथे शेतात गेलेल्या कुटुंबीयांच्या घरातून चोरट्याने सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र. ऊ. येथील संदीप लालचंद पाटील (वय ३२) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून शेतीच्या कामासाठी निघून गेले. त्यांचे वडील गुराढोरांना चारा पाणी करण्यासाठी खळ्यात गेले असता सकाळी ७ ते ९ वाजेच्या सुमारास बंद असलेले घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून घरात चोरी केली. लोखंडी कपाटामधून सुमारे १ लाख १० हजार रुपये रोख व ३० हजार रुपयांचे सोने असे १ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
त्यांचे वडील गुरांना चारा पाणी करून साडेनऊला घरी आले असता हा प्रकार उघड झाला. घराचा दरवाजा उघडा होता व कपाटातील रोख रक्कम व सोने लंपास केलेले होते. भरदिवसा सकाळच्या सुमारास अशी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. याबाबत संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमर वसावे तपास करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक अमर वसावे व पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.