यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव येथे शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्याला दि. १६ रोजी विषारी सापाने दंश केल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर पुढील उपचाराकरिता मुंबई येथे नेत असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यांना शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
हिम्मत भास्कर पाटील (वय ३८, रा. किनगाव ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, १ मुलगा, भाऊ यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा ते उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन) शुक्रवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेनंतर ते शेतात काम करीत असताना त्यांना अचानक पायाला विषारी सापाचा दंश झाला. कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते.
तेथून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुन्हा जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन) यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.