जिल्हाभरात बियाणे, खते वाजवी दरात उपलब्ध, प्रशासनाची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा कृषी निवष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर चे शुभारंभ करण्यात आले.
सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी कृषी विभाग हे जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी उपस्थित होते. टोल फ्री क्रमांक ७४९८१९२२२१ या क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या ०२५७- २२३९०५४, ९८३४६८४६२० यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर तक्रारग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे, खते उपलब्ध होत नसल्यास संपर्क करून तक्रार करावी, असे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्या ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल. आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना करण्यात येतील असे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.