मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्रातील मोदी सरकारला काहीही करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठिशी असून शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे. शेतकरी हाच राज्याचे वैभव असून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अन्नदाता आणि जीवनदाता एकच आहेत. त्यामुळे आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत करणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. तसेच राज्यातील शेतकरी कायमचा चिंतामुक्त व्हायला हवा आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये, असे सांगतानाच ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्या दिवशी राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.