पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळकोठे येथील २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश भाईदास पवार (भिल, वय २२, रा. पिंपळकोठे ता. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत पारोळा पोलिसात दादाभाऊ भिल (पिंपळकोठे) यांनी खबर दिली. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातून काम करून परत येत असताना रस्त्यालगत असलेल्या शेखर पाटील यांच्या शेतातील भोकरच्या झाडाला एक तरुण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. दादाभाऊ भिल यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांचा चुलतभाऊ सुरेश भाईदास पवार याने गळफास घेतल्याचे दिसून आले. खाजगी वाहनाने पारोळा येथील कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक संदीप सातपुते हे करीत आहेत.