मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शेतात निंदणी करीत असताना अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे घराकडे परतत असताना शेतकरी कुटुंबावर रविवारी दि. १८ ऑगस्ट रोजी संकट कोसळले. पुढे चालत असलेल्या तरुण मुलावर अचानक वीज पडली आणि तो जागीच मृत्युमुखी झाला. हि धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथे घडली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची माहीती तालुका दंडाधिकारी, मुक्ताईनगर यांना कळविण्यात आली आहे.
ईश्वर शांताराम सुशिर (वय-२२, रा. पिंप्राळा ता.मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंप्राळा गावात ईश्वर हा आई, वडील मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. ईश्वरचा परिवार शेतीकाम करून उदरनिर्वाह करीत आहे.(केसीएन)आज दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा.चे सुमारास शांताराम सुशीर हे त्यांची दोन्ही मुल विशाल व ईश्वर असे पिंप्राळा शिवारात शेतात कपाशी निंदणी करण्यासाठी गेले होते. शेतात निंदणी करीत असतांना दुपारी २ वाजेचे सुमारास अचानक पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे सुशीर परिवार घराकडे जाण्यास निघाला.
ईश्वर हा पुढे निघाला. तर थोड्यावेळाने शांताराम हे व विशाल असे आम्ही शेतातील निंदणीचे साहित्य घेवुन घराकडे जात होते. तेव्हा गावातील बाळु काशिनाथ घाईट याने दोघांना आवाज देवुन बोलविले. त्यावेळी बाळु घाईट याने शांताराम यांना सांगितले की, तुमचा मुलगा ईश्वर याचे अंगावर विज पडल्याने तो तुमच्या शेतातील बांधावर पडलेला आहे. असे सांगितल्याने शांताराम हे व विशाल असे शेताच्या बांधावर धावले. ईश्वर हा जामिनीवर पडलेला होता. तो काही एक हालचाल करीत नव्हता.
त्यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने खाजगी वाहनाने कु-हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी ईश्वर सुशिर यास तपासुन तो मयत झाल्याचे सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनने याबाबत पंचनामा करून शांताराम सुशीर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तालुका दंडाधिकारी, मुक्ताईनगर यांना कळविण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.