जळगाव एमआयडीसीतील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : येथील औद्योगिक वसाहत परिसरातील गोदामाला शेजारील व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकल्यानेच आग लागल्याची तक्रार आईस्क्रीमच्या गोदाम मालकाने दिली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश नेमीचंद कोठारी (रा. प्रभात चौक, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील जी सेक्टरमधील रॉयल एजन्सीज, बलाई ऑर्गनिक फूडसच्या गोदामाला दि. १ एप्रिल रोजी आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यात आईसक्रीमचा साठा ठेवला होता. या गोदामाच्या बाजूला निधी इंटरप्रायझेसचे गोदाम आहे. त्याचे मालक राजेश कोठारी यांनी एकत्रित असलेल्या खोलीच्या खिडकीचा काच फोडून ज्वलनशील पदार्थ गोदामामध्ये टाकल्याने आग लागल्याची तक्रार आईस्क्रीम गोदामचे मालक हुसेन अब्दुलभाई बोहरी (४१, रा. कासमवाडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली.
लागलेल्या आगीत आईसक्रीम, तीन मोठी डीप फ्रीझर, ईलेक्ट्रीक पॅनल, स्टार्टर असा एकूण १७ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला.
याप्रकरणी हुसेन बोहरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवार, ७ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि नीलेश गोसावी करीत आहेत.