जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – युट्यूब रिल्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून अमळनेर तालुक्यातील एका सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाला तब्बल २४ लाख ८२ हजार २५६ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अमळनेर तालुक्यातील वावडे येथील रहिवासी असलेले देविदास बारीकराव पाटील (वय ४४) हे सध्या पश्चिम बंगाल येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. २२ सप्टेंबर २०२५ रोजी ते युट्यूबवर रिल्स पाहत असताना, त्यांना २२ हजार रुपये गुंतवल्यास पैसे दुप्पट होतील, अशी एक लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण डेहराडून येथून बोलत असून मॉरिशस येथील ‘ट्रेडग्रीप’ नावाच्या शेअर मार्केट कंपनीशी संबंधित असल्याचे भासवले.
भामट्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ‘ट्रेडग्रीप क्लाइंट’ नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले. सुरुवातीला २० हजार ९९९ रुपयांच्या गुंतवणुकीवर १,३३१ रुपये नफा दाखवून त्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध शेअर्समध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवून जवानाला वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २४ लाख ८२ हजार २५६ रुपये भरण्यास प्रवृत्त केले.
जेव्हा पाटील यांनी आपली मूळ रक्कम आणि नफा परत मागितला, तेव्हा आरोपींनी त्यांना आणखी ५ लाख रुपये भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यास पोर्टफोलिओ स्क्रॅप करण्याची आणि कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास जळगाव सायबर पोलीस करत आहेत.









