पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना आपत्ती ; जळगाव तालुक्यातील धानवड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड येथ शेतशिवारात पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रसंगी त्यांचे कुटुंबीय शेतातच होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भैय्याभाऊ उर्फ संजय बापू पाटील (वय ४२, रा. धानवड ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह गावात राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतावर परिवारासह गेले होते. त्यावेळी पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी जात असताना त्यांना विजेचा धक्का जोरात लागून ते फेकले गेले. दरम्यान त्यांची पत्नी व पुतणी हे शेतातच होते. त्यांच्या समोर हि घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यानंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.(केसीएन)रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मनमिळावू व मेहनती शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने धानवड गावात शोककळा पसरली आहे.
घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.