“शावैम” च्या वसतिगृहांच्या वॉर्डनला दिल्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व वसतिगृहांच्या वॉर्डनची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बैठक घेतली. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वॉर्डनवर विशिष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ७ वसतिगृह अधिग्रहित करण्यात आले आहे. या सर्व वसतिगृहाचे वॉर्डन, सहाय्यक वॉर्डन यांची सोमवारी दि. १० जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांची उपस्थिती होती.
प्रसंगी वसतिगृहाची सद्यस्थिती, विद्यार्थी संख्या याबाबत माहिती वॉर्डनकडून घेण्यात आली. यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी एकत्र जेवण करू नये, शारीरिक अंतर ठेवावे, वसतिगृहात स्वच्छता ठेवावी, कोरोना महामारी लक्षात घेता मास्कचा नियमित वापर करावा, आजारी असल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे, विद्यार्थ्यांच्या हालचालींचा अहवाल वॉर्डनने अधिष्ठाता कार्यालयाला कळवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.