जळगाव (प्रतिनिधी) :- रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत शासनाच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात साजरे करणार आहे. या संमेलनाच्या महत्वाचा भाग म्हणजे सर्व जिल्ह्यातील कलावंत व नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १४ जानेवारी पासून सुरु होणार आहे. या महोत्सवात सर्व कलावंतांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रावर होणाऱ्या या नाट्यकलेचा जागर अंतर्गत जळगाव जिल्ह्यातदेखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे एकांकिका स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यात होणार आहे.
१४ जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरु होवून यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यशाळेत नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर अंतिम फेरीतील संघांच्या सादरीकरणाचा दर्जा सर्वोत्तम असणार आहे.
व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व हौशी गुणवंत कलावंतांना शतक महोत्सवी नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागर महोत्सवातून मिळणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.१ हजार व बालनाट्यासाठी रु.५०० व इतर स्पर्धांसाठी रु.१०० राहणार आहे. ही प्रवेश फी व प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावयाचे असून, त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ आहे.
नाट्यकलेचा जागर या स्पर्धा महोत्सवात जळगाव केंद्रासाठी केंद्रप्रमुख योगेश शुक्ल (९६५७७०१७९२), सहयोगी प्रमुख ॲड.संजय राणे, प्रा.स्वप्ना लिंबेकर – भट (7030545342) यांचेशी संपर्क करावा.