जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एम.जे. कॉलेज मागील लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या नामदेव भावराव गोपाळ ( वय ५५) यांना सुनेच्या माहेरच्या लोकांनी लोखंडी रॉडसारख्या काठीने डोक्यावर, हातापायावर जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
एम. जे. कॉलेज मागे गिरणा टाकी जवळ लक्ष्मी नगर परिसरात नामदेव भावराव गोपाळ ( वय ५५) हे परिवारासह राहतात. नातेवाईकांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. नामदेव गोपाळ यांच्या सुनेच्या तक्रारीवरून तिच्या माहेरच्या मंडळींनी निफाड येथून गुरुवारी जळगाव गाठले. तेथे नामदेव यांचा मुलगा सुनील यास त्याच्या सासरच्या मंडळींनी जाब विचारत मारहाण केली. मात्र मुलासाठी नामदेव गोपाळ मध्ये आले. त्यात सुनीलचे शालक सागर पिंटू लोणारी (रा. कसबे सुकेणे ता.निफाड जि. नाशिक) याने काठीसदृश रॉड नामदेव गोपाळ यांच्या डोक्यात मारला. तसेच हातापायावर देखील मारहाण केली.
यामध्ये नामदेव गोपाळ जबर जखमी झाले. कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान, रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून संध्याकाळी जखमींचे जाबजबाब घेण्याचे काम सुरु होते.