केंद्र, राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव,(प्रतिनिधी) – सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे २०२३-२४ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींना समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळावे. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्यशासनाच्या विविध शासकिय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांमार्फत राबविल्या जाणार आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महामंडळाची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथील एन.एस.एफ.डी.सी.च्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लाख रूपये, दीड लाख रूपये व २ लाख रूपये , चर्मोद्योग २ लाख रूपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. या योजना व मागील प्रलंबित प्रकरणांकरिता २२ कोटी २१ लाखांचा निधी महामंडळाला प्राप्त झालेला आहे.
सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सीच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी १ लाख ४० हजार रूपये तसेच नवीन महिला अधिकारिता योजनेकरीता रूपये ५ लाख मंजूर झालेले आहेत. एन.एस.एफ.डी.सी च्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख रूपये व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गजभिये यांनी केले आहे.