जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- आगीत दुचाकीसह सायकल जळून खाक झाल्याने हतबल कुटुंबाची होत असलेली शैक्षणिक फरफट पाहता पोलिसांचे मन द्रवले. त्यांनी लागलीच आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने मुलीला नवीन सायकल घेवून देत खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी मुलीसह तिच्या पित्याला अश्रू अनावर झाले होते.
जळगाव शहरातील माधव नगरात अमोल रमेश जंगले हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे असलेल्या (एमएच १९, बीझेड ३६९८) क्रमांकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. यामध्ये दुचाकीसह त्यांची मुलगी अक्षरा हीचे सायकल देखील जळून खाक झाली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रविंद्र परदेशी व पोहेकॉ विजय पाटील घटनास्थळी दाखल झाले. या चिमुकलीची शाळा का. ऊ. कोल्हे विद्यालय तिच्या घरापासून सुमारे सहा किमी लांब होती. तीची सायकल जळून खाक झाल्याने चिमुकल्या अक्षराला पायीच शाळेत जावे लागत होते. रविंद्र परदेशी व विजय पाटील या दोघ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत व चिमुकलीच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होवू नये म्हणून लागलीच त्यांनी संदीप इंधाटे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्र्वर गावंडे, भूषण पाटील, अविनाश पाटील, बंटी राणे, गिरीश पाटील या उद्योजकांनी मदतीचा हात पुढे करीत चिमुकलीला नवीन सायकल भेट दिली.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह उद्योजकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी चिमुकल्या अक्षराला नवीन सायकल भेट दिली. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण बघून तिच्या कुटुंबिय भावूक झाले झाले होते.