जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून लक्ष्मण अशोक जाधव (१५, रा. सुप्रीम कॉलनी) या विद्यार्थ्यावर कुसुंबा येथे शाळा परिसरातच धारदार शस्त्राने वार करण्यात आला तसेच दगडानेही मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुसऱ्या तुकडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सुप्रीम कॉलनी परिसरातील लक्ष्मण जाधव हा विद्यार्थी कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकतो. दि. ६ रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर लक्ष्मण हा घरी जात असताना शाळा परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून इयत्ता नववीच्या दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थ्यांसह आठ ते १० जण लक्ष्मण जवळ आले व शिवीगाळ करु लागले. यावेळी चाकूसारख्या धारदार वस्तूने लक्ष्मणच्या उजव्या पायावर, पाठीवर दोन ठिकाणी, पोटाच्या डाव्या भागावर व डोक्यावर वार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या कानावर दगडानेही मारले असून पोटात रक्तस्त्राव झाला आहे. या प्रकरणी जखमी मुलाच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून वार करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.