पोलिसांचा कसून शोध सुरू; आमदार मंगेश चव्हाण यांची कुटुंबीयांना भेट, तपासाला गती
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहराजवळील चाळीसगाव तालुक्यातील तलवाडा गावात शाळेत गेलेली चौथीतील ९ वर्षांची बालिका गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनीही थेट कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांना तात्काळ कसून तपासाचे आदेश दिले आहेत.
तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी धनश्री रमेश शिंदे (वय ९) ही बालिका शुक्रवारी (दि. १२) सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र सायंकाळी आई-वडील शेतातून घरी परतले असता धनश्री घरी न आल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या पालकांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. मात्र शाळा सुटलेली होती. शिक्षकांकडे चौकशी केली असता, सायंकाळी पाच वाजेपर्यंत धनश्री शाळेत होती आणि नंतर ती घरी गेल्याचे सांगण्यात आले.
यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी गावासह आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, तरवाडा ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सायंकाळी सुमारे चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास धनश्री ही ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेतून रस्त्याने जाताना दिसून आली. त्यानंतर ती कुठे गेली, याचा कोणताही मागोवा अद्याप मिळू शकलेला नाही.
चार दिवस उलटूनही मुलगी सापडत नसल्याने शिंदे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीने तिच्या अल्पवयीनतेचा फायदा घेऊन अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कुणाल चव्हाण व पोलीस कर्मचारी करत असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तसेच परिसरातील प्रत्येक शक्यता तपासली जात आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांची कुटुंबीयांना भेट
दरम्यान, रविवारी चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तलवाडा गावात जाऊन शिंदे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पोलिसांकडून तपासाचा आढावा घेतला असून, या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने व तत्परतेने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गावातील नागरिक, पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
चिमुकली धनश्री सुरक्षितपणे सापडावी, यासाठी संपूर्ण गावासह तालुक्यात प्रार्थना होत असून, लवकरात लवकर तिचा शोध लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









