धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
धुळे (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील म्हसदी (प्र. नेर) या गावात उर्दू शाळेच्या विकास कामासाठी निधीची मंजुरी मिळण्याकरिता लागणाऱ्या खर्चात २० टक्के कमिशन मागणाऱ्या व त्यात २ लाख रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी आहेत तर त्यांच्या पत्नी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तक्रारदाराच्या पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वॉर्डात विकासकामे मंजूर होण्याकरीता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेत त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वॉर्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज दिला होता. यावेळी ग्रामसेवक बोरसे यांनी अंदाजे १२ लाखांच्या कामासाठी सुमारे २० टक्के प्रमाणे २ लाख ४० हजार रुपये काम घेणार्या इच्छूक ठेकेदाराकडून आगावू कमिशन मागितले होते.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २० फेब्रुवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणी ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी दोन लाखांची लाच मागून ५० हजारांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. गुरुवार, २५ रोजी सापळा रचल्यानंतर ग्रामसेवक बोरसे यांनी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.