जागतिक शाकाहार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

जळगाव, (प्रतिनिधी) – प्रत्येकाने सुदृढ आरोग्यासाठी शाकाहार अवलंबवावा. मांसाहाराने मॅड काऊ, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू व आता कोरोना महामारी जगाला भेट स्वरुपात मिळाली आहे. त्यामुळे चांगले विचार, चांगले आचार याकरिता शाकाहार सर्वोत्तम आहार असल्याचे शाकाहार प्रेमी रतनलाल बाफना यांनी म्हंटले आहे.
जागतिक शाकाहार दिनानिमित्त दरवर्षी श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स याच्या सहकार्यने शाकाहार समर्थन रॅली काढण्यात येते. यंदा करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर रॅली न काढता व्हिडीओ विविध ऑनलाईन शाळेत, क्लासेस मध्ये १ ऑक्टोबर रोजी दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये युवाचार्य श्री महेंद्रऋषि महाराज आणि शाकाहार प्रणेता रतनलाल बाफना यांनी शाकाहार – उत्तम आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
व्हिडीओतील मार्गदर्शनाचा लाभ सुमारे २५ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह काही कोचिंग क्लासेस, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी, विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी यांनी प्रस्तावना करून सुरुवात केली. देशात करोनाने थैमान घातले आहे. बाफना म्हणाले की, हा करोनाचा फैलाव चीनच्या वुहान शहरातील मटण मार्केट मधून झाला आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मांसाहाराने अनेक आजार शरीराला जडतात व मानव प्राणी दुःखी होऊन बसतो. संपुर्ण जगात पोल्ट्री उद्योग वृद्धिंगत होत आहे. विश्वातील वैज्ञानिकांनी हे लक्षात आणून दिले आहे की, पुढील महामारी ही याच पोल्ट्री उद्योगांमुळे संपूर्ण विश्वात पसरेल व जगातील लोकसंख्या कमी होऊन जाईल. त्यामुळे आपण शाकाहारी बनू शकता, मांसाहार करु नये असे नम्र आवाहन आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफणा यांनी केले आहे.







