नंदुरबार एलसीबी, शहादा पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) :– शहादा येथे झालेल्या घरफोडीमध्ये चोरलेले सोने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींनी चोपडा शहरातील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितले होते. नवीन टाटिया यांची चौकशी करून शहादा पोलिसांनी त्याच्या कडून चोरीचे घेतलेले २० लाख रुपये किंमतीचे २७ तोळे सोने हस्तगत केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी वसंत लक्ष्मण शहा (वय ८०, रा. पाटळदा, ता. शहादा) यांच्या घरी घरफोडीची घटना घडली होती. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने, चांदीचा ऐवज चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी राहुलसिंग मोतीसिंग भाटिया (वय २५) या संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून इतर दोघे फरार आहेत. संशयिताने यातील चोरीचे काही दागिने चोपडा येथील माणक ज्वेलर्स या दुकानात विकल्याची कबुली दिली होती. त्यावरून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलीस तपास करत होते. तेथील दोन्ही पथके चोपडा येथील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन टाटीया यांच्या मागावर होते. आता त्यांच्याकडून चोरीचे घेतलेले २० लाख रुपये किंमतीचे २७ तोळे हस्तगत करण्यात आले.