जळगाव रामानंद नगर पोलीसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – येथील रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीने देशव्यापी मोठे सायबर गुन्ह्याचे रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी २ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर शनिवारी दिवसभरात ४ संशयित आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित ३ संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ४१२ कोटी रुपये फसवणूक करण्यापासून वाचवले आहे.
एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळीचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्ड क्लोन करून ४१२ कोटी रूपयांची चोरी करण्याचा प्लॅन या टोळीने आखला होता. यात हॅकर मनीष भंगाळे हा पंटर साक्षीदार बनला असून तो वगळता यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे. शुक्रवारी रात्री १०. ३० वाजेच्या सुमारास जयेश मणिलाल पटेल (वय २६) रा. चिखली, गुजरात याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शनिवारी १७ रोजी नाशिक येथील भरत अशोक खेडकर (वय ४३), रवींद्र भडांगे दोन्ही रा. जेलरोड, नाशिक, दीपक राजपूत (वय ३८), रा. पंचवटी, नाशिक यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर स्वतः तपास करीत असून आणखी तीन संशयितांच्या मागावर पोलीस आहेत.







