सावदा शहरात गोठ्यातून दोन म्हशी व पारडूची चोरी

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
सावदा (प्रतिनिधी) : सावदा शहरातील बसस्टँडमागील खाजगी जागेतून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोन म्हशी व एक पारडू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ वारके (वय ५७, धंदा – दुग्धव्यवसाय, रा. काझीपुरा, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्या मालकीच्या गोठ्यातून दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेपासून दि. १५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात आरोपींनी चोरी केली. घटनेची तक्रार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३९ वाजता दाखल करण्यात आली.
चोरट्यांनी फिर्यादींच्या गोठ्यातील एक ७ वर्षांची म्हैस (किंमत अंदाजे ५५,००० रुपये), एक ९ वर्षांची म्हैस (किंमत अंदाजे ५५,००० रुपये) तसेच २ महिन्यांचे पारडू (किंमत अंदाजे १,००० रुपये) असा एकूण १,११,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरीस गेलेल्या म्हशी काळ्या रंगाच्या असून डोक्यावर विशिष्ट खुणा असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोना जाकीर मन्सुरी हे करीत आहेत.









