मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला. परंतु, रामदास आठवले यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नसल्याचे म्हंटले आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी मी सहमत नाही, असे रामदास आठवलेंनी म्हंटले आहे.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना एक राजा तर बिनडोक असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नामोल्लेख न करता खा. उदयनराजे यांच्यावर केली होती. यावर बोलताना रामदास आठवले यांनी छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.
मराठा आरक्षणाला अडचण असल्याने एमपीएससी परीक्षा रद्द करू नये. एमपीएससी परीक्षा झालीच पाहिजे, अशीही भूमिका आठवलेंनी मांडली आहे.
तसेच, बिहार निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना ५० उमेदवार उतरवणार आहे. परंतु, बिहारमध्ये शिवसेनेची ताकद नसल्यामुळे भाजपाला त्याचा फटका बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.