सणानिमित्त दक्षता घेण्याच्या प्रशासनातर्फे सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन आदी अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई इ. अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहिम हाती घेतलेली आहे.
प्रशासनातर्फे ग्राहकांना अन्न पदार्थ खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मिठाई, दुध व दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थ खरेदी करतांना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनाकडुन खरेदी करावे, त्याचे खरेदी बिल घेवून जतन करावे, मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे, खरेदी करतांना वापर योग्य दिनांक पाहुन खरेदी करावी, उघडयावरील अन्नपदार्थांची खरेदी करु नयेत, माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासाच्या आत करावे, तसेच साठवणूक योग्य तापमानाला (फ्रिजमध्ये) करावी, मिठाईवर बुरशी आढळल्यास तसेच चव, वासामध्ये फरक जाणवल्यास ती मिठाई सेवन करु नये, ग्राहकांनी अधिक माहिती व तक्रारी करण्यासाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करण्याचे आवाहन, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.