अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
सावदा (वार्ताहर): रावेर तालुक्यातील सावदा ते पाल दरम्यान असलेल्या पाल घाटात एका अज्ञात बोलेरो पिकअपच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक ४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमोल चव्हाण आणि बिस्मिल्ला तडवी (रा. पाल, ता. रावेर) हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एमएच-१९-डीएक्स-४७६६) सावदा-पाल मार्गावरून जात होते. पाल घाटातील खिरोदा फॉरेस्ट नाक्याजवळील वळणावर मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात बोलेरो पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोन्ही स्वार खाली कोसळले. यामध्ये बिस्मिल्ला तडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला.
या घटनेबाबत मनीष धनराज चव्हाण (वय ३८, रा. पाल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल सिराज तडवी करत आहेत.









