सम्यक दृष्टी बाळगणारा ‘अमूढ’ म्हणजेच विवेक बुद्धी जागृत असलेला असतो. जगात ‘मूढ’ आणि ‘अमूढ’ अशा दोन प्रकाराच्या व्यक्ती असतात. विवेकी व्यक्ती कुसंगतीत गेला तरी त्याच्यात बिघाड होत नाही. यासाठी चंदनाचे उदाहरण दिले गेले. चंदनाच्या झाडाला असंख्य विषारी भुजंग लपेटलेले असतात, ते चंदनाचे वृक्ष विषारी होते का? आजच्या काळात आपला मेंदू जगातली सर्वात अनमोल गोष्ट आहे परंतु त्यात नको तो कचरा भरून ठेवतो. आतून बाहेरून स्वच्छ व्हायचे असेल, मूढता घालवायची असेल तर सत्संग करणे आवश्यक आहे… असा मोलाचा सल्ला शासनदीपक प.पु. सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांना आज धर्मसभेत दिला.
आपले हित, अहित कशात आहे हे समजले पाहिजे. नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची, काळ्या तोंडाचा राक्षस आणि लाल फडक्यात पुरचुंडी बांधून काहीतरी वर बांधून ठेवलेले असते. हा सगळ्या आपल्या मनाचा खेळ असतो. शकून, अपशकून असे काही नसते. त्यासाठी नगरातील अपशकुनी व्यक्ती व राजाचे चपखल उदाहरण त्यांनी सांगितले. आपल्या मनातील अंधःकार ज्ञानज्योतीने दूर करा. त्यासाठी दिवाळीचा पर्व मनवला जातो. ह्या दिवाळीमध्ये तुम्ही तेलाचे दिवे लावतात ना त्या ऐवजी तेला तीन दिवसीय उपवास याचे दिवे लावा व आध्यात्माचा प्रकाश सर्वदूर पसरवा असेही प्रवचनात आवाहन केले गेले.
आपल्या मिळालेला जन्म आपण कसा व्यर्थ घालवित आहोत याबाबतचे विचार प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी व्यक्त केले. या शरीसाठी आत्म्याशी खूप छेडछाड केली गेली आहे आता जागे होऊन आत्मकल्याच्या दृष्टीने पुरुषार्थ करायला हवा. आत्म्याच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील रहावे, वेळेत जागृत झालेले बरे असते असे त्यांनी सांगितले.