शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण : नदीत सोडले पाणी
यावल (प्रतिनिधी) : सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले मोर धरण ८५ टक्के भरल्याने, धरण प्रशासनाने गुरुवारी १५०.९६ क्युसेक पाणी मोर नदीपात्रात सोडले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मोर नदीत पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोर नदीचा प्रवाह मारूळ, न्हावी, आमोदा, वनोली, कोसगाव आणि पाडळसा या गावांमधून जातो. नदीत पाणी सोडल्याने या गावांच्या शिवारातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, येत्या काही दिवसांत विहिरी व नळजल योजनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत या निर्णयाचे स्वागत केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातपुडा भागात दमदार पावसामुळे धरणात पाणीसाठा लक्षणीय वाढला आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात मोर नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांच्या अनुभवावरून, मोर नदीत पाणी आल्यावरून पाण्याच्या पातळीवत वाढ झाली आहे. सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे विशेषतः नदीपात्रात उतरू नये, जनावरांना नदीजवळ नेऊ नये आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. भूजल वाढीचा अनुभव गेल्या १०-१३ वर्षाच्या अनुभवावरून, मोस नदीत पाणी आल्यावर परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ होते, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदा शेती हंगाम अधिक समाधानकारक होण्याची आशा निर्माण झाली आहे.