RBI व भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती; विविध शासकीय योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी
यावल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा तसेच शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सातोद येथे वित्तीय समावेशन संतृप्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला.



या कार्यक्रमाला RBI मुंबईचे श्री. अविनाश साहेब, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. सुनील कुमार, SBI जळगावचे FI मॅनेजर श्री. विकास पाटील, SBI यावल शाखा व्यवस्थापक श्री. राधेश्याम मुंगमोळे, ग्रामविकास अधिकारी श्री. उल्हास पाटील, श्री. चेतन पाटील, श्री. दीपक पाटील आणि श्रीमती मुमताज तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना या महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच निष्क्रिय बँक खाती पुन्हा सुरू करणे, प्रलंबित KYC व Re-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आणि नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे, आर्थिक सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे आणि प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सेवा व विमा संरक्षणाच्या कक्षेत आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी, BC, CSP, CRP, जिल्हा समन्वयक तसेच इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासोबतच त्यांना बँकिंग आणि सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्याच्या दृष्टीने सातोद येथील हे वित्तीय समावेशन शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.








