मुक्ताईनगर तालुक्यात एसीबीची कारवाई
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यात कुऱ्हा काकोडा येथे सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्यासह तलाठी व आणखी एका पंटरला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा हे त्यांचे मूळ गाव आहे. त्या ठिकाणी ११९७ मध्ये त्यांचे आजोबा मयत झाले होते. दरम्यान तेव्हापासून त्यांच्या वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे नावे ७/१२ उताऱ्यावर नाव लावलेले नव्हते. दरम्यान तक्रारदार यांनी गेल्या ७ ते ८ दिवसांपूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय-४२) यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात माहिती सांगितली. दरम्यान तलाठी यांनी सांगितले की, तुम्हाला प्रत्येक वर्षाचे २२० रुपये प्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणीसाठी दि. १ रोजी तलाठी प्रशांत ढमाले (वय-४२, रा.चिखली ता.मलकापूर जि. बुलढाणा), खाजगी इसम अरुण शालीग्राम भोलनकार (वय ३२ वर्ष, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव) यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार आज पथकाने बुधवारी ८ जानेवारी रोजी सापळा रचून संशयित अरुण भोलाणकर यांचे सांगणेवरून दुसरा खाजगी इसम संतोष प्रकाश उबरकर (वय-२५) याला लाच घेताना पकडले. अशा तिघांवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील
पोकॉ/प्रदिप पोळ, पोकॉ/प्रणेश ठाकूर, पोकॉ/सचिन चाटे यांनी कारवाई केली आहे.