पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजय सुरेश पाटील (वय ४०, रा. अंतुर्ली बु., ता. पाचोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अजय पाटील यांना सर्पदंश झाल्याने त्यांचे नातेवाईक महेश पंडित पाटील यांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथून प्राप्त झालेल्या लेखी मेमोनुसार, अजय पाटील यांना ‘मृत अवस्थेत’ रुग्णालयात आणण्यात आले होते. या माहितीवरून पाचोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक हटकर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









