नातेवाईकांकडून डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान ; जीएमसीच्या वैद्यकीय पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील ९ वर्षीय मुलाला विषारी साप चावल्यावर त्याची प्रकृती खालावत होती. दरम्यान, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागातील वैद्यकीय पथकाने सदर रुग्णावर यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचविले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
भुसावळ येथील तनिश दिनेश पाटील हा ९ वर्षीय बालक सकाळी घराजवळ असताना त्याला दि. २८ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सापाने दंश केला होता. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोगशास्त्र विभागात सकाळी १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्याने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ५ दिवस सातत्याने बालरोग विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक सातत्याने उपचार करीत होते. अतिदक्षता विभागात ४ दिवस ऑक्सिजन देऊन त्याच्यावर उपचार करून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतर बुधवारी दि. ३ जून रोजी तो मूळ स्थितीत येऊन बरा झाला.
मुलगा मृत्यूच्या दाढेतून परतल्यामुळे नातेवाईकांनी आनंदित होऊन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, बालरोगशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, सहायक प्रा. डॉ. गिरीश राणे यांच्यासह नर्सिंग स्टाफचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. बालकावर उपचार करण्याकामी डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा चांडक, डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. मयूर घुगे, डॉ. अनिरुद्ध कारंडे, डॉ. सुरसिंग पावरा, डॉ. प्रतिभा कदम, डॉ. रितेश पांडे, डॉ. शुभम चव्हाण यांच्यासह अतिदक्षता विभाग इन्चार्ज परिचारिका श्रद्धा सपकाळ यांच्यासह नर्सिंग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.