चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस खाते आणि वनविभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून तीन तरुणांची प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी घनशाम कैलास पाटील (वय ३०, रा. हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव) यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने घनशाम पाटील यांच्यासह दीपक गोपीचंद चव्हाण आणि हर्षल दिलीप चव्हाण यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवले. “मी तुम्हाला पोलीस दलात किंवा वनविभागात नोकरी लावून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. हा व्यवहार चाळीसगाव शहरातील ‘गणेश कॉम्प्लेक्स’मधील देवांश मोबाईल शॉपी आणि बँक ऑफ इंडिया परिसरात झाला. दि. ७ जून २०२४ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने या तिघांकडून प्रत्येकी २ लाख रुपये, असे एकूण ६ लाख रुपये उकळले.
मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपीकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. याप्रकरणी घनशाम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कुणाल डांगर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर घटनेचा पुढील तपास करत आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









