जळगावात अहवाल, चौकशीनंतर ४ वर्षांनी शासनातर्फे गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरी मिळवण्यासाठी ‘डमी’ उमेदवार बसवल्याप्रकरणी चार वर्षांनंतर अखेर राहुल रोहिदास पावरा या उमेदवाराविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवाराच्या अर्जातील फोटो, प्रत्यक्ष परीक्षेतील फोटो आणि कागदपत्र पडताळणी वेळीच्या फोटोमध्ये तफावत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात सरळ सेवेने ८६५ पदांसाठी १७ जुलै २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या पदांसाठी २० ते २७ ऑगस्ट २०१९ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.(केसीएन)राहुल रोहिदास पावरा या उमेदवाराने जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात ही परीक्षा दिली होती. त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्ये सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत कागदपत्रांची छाननी सुरू असताना, राहुल पावरा या उमेदवाराच्या छायाचित्रांमध्ये मोठी तफावत दिसून आली.
छायाचित्रांमधील तफावत लक्षात आल्यावर, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. छायाचित्रांची फेरतपासणी करून अहवाल तयार करण्यात आला आणि तो मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला. प्रयोगशाळेने तिन्ही फोटो (अर्जातील, ऑनलाइन परीक्षेतील आणि कागदपत्र पडताळणीवेळीचा) तपासले असता, त्यांत स्पष्ट तफावत असल्याचे निष्पन्न झाले.(केसीएन)या अहवालानंतर सविस्तर अहवाल सादर करण्यात आला, ज्यामुळे राहुल पावरा याने डमी उमेदवार बसवून फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. न्यायवैद्यक अहवाल आणि प्रशासकीय चौकशीनंतर १५ मे रोजी कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहायक नम्रता पवार यांनी रामानंदनगर पोलिसांत राहुल रोहिदास पावरा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.