जळगाव ( प्रतिनिधी ) – सरकारी कामात अडथळा आणलेल्या भाऊसाहेब त्र्यंबक पाटील ( रा. चाळीसगाव ) या आरोपीला सहा महिन्याची सक्तमजूरी व दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. बी. बोहरा यांनी दिली
दत्तात्रय नाना पाटील ( रा. भामरे ता. चाळीसगाव ) याच्यावर पाचोरा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्याच्याविरोधात २६ ऑक्टोबर २०१९ रोजी पकड वारंट जारी करण्यात आले होते. पोहेकॉ सुभाष पाटील यांनी आरोपी दत्तात्रय पाटील याला अटक करून चाळीसगाव पोलीस ठाण्यात आणत असतांना आरोपी भाऊसाहेब पाटील याने पोलीसाची अडवणूक करून “दत्तात्रय पाटील याला अटक करू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल, मी तुमच्याविरूध्द खोटनाटे अर्ज करून बदनामी करेल” अशी धमकी देवून आरोपीला पोलीसांच्या ताब्यातून हिसकावून पळवून नेल्याचा प्रयत्न केला होता. चाळीसगाव पोलीसात भाऊसाहेब पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा खटला न्या. व्ही.बी. बोहरा यांच्या न्यायालयात सुरू होता. खटल्याची सुनावणी शुक्रवारी करण्यात आली. सरकारपक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. पो कॉ सुभाष पाटील व प्रत्यक्षदर्शी साक्षिदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या बोहरा यांनी आरोपी भाऊसाहेब पाटील याला दोषी ठरवत सहा महिन्याची सक्त मजूरी आणि दीड हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड.भारती खडसे यांनी काम पाहिले केस वॉच पोहेकॉ दिलीप सत्रे व पैरवी अधिकारी जरीना तडवी यांनी काम पाहिले.