जळगावातील आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आकाशवाणी चौकात रविवारी रात्री सर्कलला भरधाव वेगात असलेल्या आयशरने धडक दिल्याने ती पलटी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातात एक इनोव्हा तसेच अन्य एका कारचे देखील नुकसान झाले आहे.
जळगाव शहरातून जाणार्या महामार्गाचे चौपदरीकरण होतांना प्रमुख चौकांमध्ये सर्कल तयार करण्यात आल्याने मोठी अडचण होत आहे. यात अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक आणि आकाशवाणी चौकातील सर्कलमुळे बर्याच वेळेस लहानमोठे अपघात झाले आहेत. असाच एक अपघात आज रविवारी रात्री दहाच्या सुमारास झाला आहे. आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कलला भरधाव वेगात असलेल्या आणि पाळधीकडून आलेल्या आयशरच्या (क्रमांक जीजे १२ बीवाय-६८२३ ) चालकाला वाहन नियंत्रीत करणे न जमल्याने त्याने थेट सर्कलला टक्कर मारली.
यानंतर त्याचे वाहन पुढे दुभाजकावर जाऊन उलटल्याने मोठा आवाज झाला. या अपघातात एक इनोव्हा तसेच अन्य एका कारचे देखील नुकसान झाले आहे. तर आयशरमध्ये असणारे खोके रस्त्यावर पडले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. तर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या संदर्भात चौकशीसाठी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले होते. आकाशवाणी चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले आहे.