मुंबई ( प्रतिनिधी ) – एसटी महामंडळाने संपात सहभागी झालेल्या व रोजंदारीवर काम करणाऱ्या मुंबईतील 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे.
मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 66 बसेस मुंबईतून राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महामंडळाने आतापर्यंत एकूण 2,178 कर्मचाऱयांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी. कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी उच्चस्तरीय समितीसमोर संघटनेची बाजू आज मांडली. राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या या बैठकीतही संपाबाबत तोडगा निघाला नाही.
‘एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या युनियनचे प्रतिनिधी सरकारला भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनेक मागण्या मार्गीही लावल्या. मात्र ते पुन्हा चर्चेसाठी येत नाहीत. लाखो कामगार आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. युनियनचे कोण कोणाला ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोणाशी बोलायचे ते सांगा,’ असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना केला आहे.
28 संघटनांच्या युनियनलाही कामगार मानायला तयार नाहीत. त्यामुळे कोणी पुढं येऊन हमी घेत असेल तर माझी कोणाशीही बोलायची तयारी आहे,’ असंही परब यांनी स्पष्ट केलं. एसटीमध्ये सध्याच्या घडीला 1200 ते 1500 रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यायला हवं अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. उद्या ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.