महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा जळगावात उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनातर्फे सुरू असलेल्या संपदरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये १०८ रक्ताच्या पिशव्या संकलित झाल्या. या उपक्रमाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभरामध्ये संप सुरू आहे. मंगळवारपासून नवीन पदभरती झालेल्या परिचर्या संवर्गातील स्त्री- पुरुष कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजेरी लावली. तर जुन्या १९ जणांचा बेमुदत संपत सुरूच आहे. या संप कालावधीदरम्यान सर्व परिचारिका संघटनांनी बुधवार दि. २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर घेतले. या रक्तदान शिबिरामध्ये १०७ परिचारिका व परिचारक यांनी रक्तदान केले.
सदर रुग्ण हित लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नवीन पदभरती असलेले ब्रदर व सिस्टर हे कामावर रुजू झाले आहेत. तर संप काळामध्ये रक्तदानासारखे विधायक कार्य केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी संघटनेचे कौतुक केले आहे. यावेळी अध्यक्ष रूपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळ यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.