अन्यथा एकदिवसीय चूलबंदआंदोलन : गोर सेनेचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : महायुती सरकारने सहा महिन्यांपूर्वी राज्यातील ५ हजार तांडयांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती करून सर्व तांड्यांसाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची घोषणा केली होती. तसेच तांडा विकासासाठी ५०० कोटींची तरतूद करून अध्यादेश काढला होता. परंतु ६ महिने उलटूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी अथवा चालू अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात कुठलाही उल्लेख न आल्यामुळे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्रवण चव्हाण यांनी दि. ३१ ऑगस्ट मुक्तीदिनी एकदिवसीय चूलबंद आंदोलन करण्याचा इशारा पत्राच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. या आंदोलनाला गोर सेनेचे जळगांव जिल्हा सचिव चेतन जाधव यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी महायुती सरकारने बंजारा समाजासाठी दोन अध्यादेश काढले. राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यांना महसुली दर्जा देऊन तांडयांना स्वतंत्र ग्राम पंचायत केली जाईल. त्यासोबतच बंजारा समाजाच्या सर्वागीण विकासासाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना व त्यात तांडा विकासासाठी ५०० कोटीच्या तरतुदीचा अध्यादेशसुद्धा त्याचवेळी काढण्यात आला होता. अलीकडच्या काळात मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दहा-बारा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु या अध्यादेशाला निघून सहा महिने उलटून गेले तरीसुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून किंवा इतर कुठल्याही मंत्र्याकडून अंमलबजावणीची कुठलीही शक्यता दिसत नाही.
त्यामुळे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने दि. ३१ ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त राज्यातील सुमारे ५ हजार तांड्यामध्ये एकदिवसीय चूलबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय बंजारा टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण, गोर सेनेचे जळगांव जिल्हा सचिव चेतन जाधव, एकनाथ जाधव, अमोल पवार, शालिग्राम पवार, चरणदास पवार, साईदास चव्हाण, अनिल राठोड, अभिजीत चव्हाण, अर्जुन जाधव, सुनिल चव्हाण, सिताराम चव्हाण व ३२ जिल्ह्यांच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.