जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) :- संत मुक्ताई संस्थानच्या पॉलीटेक्नीक कॉलेजसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची एकरकमी २ कोटी ९२ लाख कर्जफेड करण्यास मंजूरी देण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आजच्या सभेत एकूण २४ प्रस्तावावर चर्चा करण्यात आली, त्यात संत मुक्ताई संस्थानच्या पॉलीटेक्नीक कॉलेजसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची एक रकमी कर्ज वसुलीबाबतचा होता. संस्थाने ८९ लाख रूपये कर्ज घेतले होते. परंतु त्यांची परतफेड न केल्यामुळे व्याजासह ती रक्कम ४ कोटी ९२ लाख रूपये झाली
होती. त्यावेळी जिल्हा बँकेने १९.५ टक्के दराने व्याज आकारणी केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एक रकमी रक्कम जमा करण्यासाठी आज प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
संचालक मंडळाने त्याला मंजूरी दिली आहे. आता ११ टक्के व्याजदराने आकारणी करून एक रकमी २ कोटी ९२ लाख रूपये भरण्यास मंजूरी देण्यात आली यासाठी १५ दिवसात ५० टक्के रक्कम भरून उर्वरीत रक्कम टप्याटप्याने एक वर्षाच्या आत भरण्यास मुदत देण्यात आली आहे. या शिवाय एकूण २३ विषयांना मंजूरी देण्यात आली आहे. सभेला उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील, संचालक गुलाबराव देवकर, प्रदीप देशमुख, जयश्री महाजन, आदी उपस्थित होते. यावेळी आ. एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील अनुपस्थित होते.