जरीन शेख, गौरी सूर्यवंशी अव्वल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – रविकिर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत मेधा शोध परीक्षा (इयत्ता ९ वी) २०२५–२६ चा निकाल जाहीर झाला असून चाळीसगावच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.


या परीक्षेत राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थिनी जरीन गफ्फार शेख तसेच अभिनव शाळेची विद्यार्थिनी गौरी विनोद सूर्यवंशी यांनी १०० पैकी ९४ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
संस्कृत विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे भाषिक ज्ञान वाढावे या उद्देशाने दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी चाळीसगाव येथील अनुपम संस्कृत केंद्रातून ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत जरीन गफ्फार शेख व गौरी विनोद सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ९४ गुण मिळवले. त्यांच्या या यशामुळे संबंधित शाळांचे तसेच चाळीसगाव शहराचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तरटे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाची चांगली तयारी केली होती. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. जरीन गफ्फार शेख व गौरी विनोद सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही संस्कृत विषयाकडे आकर्षण निर्माण होऊन भविष्यात अधिक विद्यार्थी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतील, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.









