समाजकल्याण विभागातर्फे जेष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जागतिक ज्येष्ठ दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. संस्कारांची शिदोरी भावी पिढीला देण्यासह आनंददायी जीवन जगण्याला प्राधान्य दया अशी भावनीक साद घालत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. तसेच प्रशासन ज्येष्ठांसाठी असलेल्या योजना राबविण्यासाठी कटिबध्द असल्यांची ग्वाही दिली.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालीका आयुक्त विदया गायकवाड, ॲड. सुशिल अत्रे, डॉ. शशिकांत गाजरे, फेसकॉमचे प्रतिनिधी डी. टी. चौधरी, जगतराव पाटील, सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी ॲड. सुशिल अत्रे यांनी आई, वडील व जेष्ठ नागरीक यांच्या चरीतार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ मधील विविध कलमांची सोप्या पध्दतीत मांडणी केली तर डॉ. शशिकांत गाजरे यांनी, वृध्दापकाळात ज्येष्ठांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फेसकॉमचे प्रतिनिधी डी टी चौधरी, जगतराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक दिनांचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदार ओळखपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सुत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. आभार कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व बार्टीचे तालुका समन्वयक आदींनी परिश्रम घेतले.