यावल तालुक्यातील न्हावी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी जळगावात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या तरूणाच्या न्हावी ता. यावल येथील घरावर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावी येथील सध्या जळगावात शिक्षण घेणाऱ्या तरूणाने आक्षेपार्ह असणारे स्टेटस ठेवले. हे स्टेटस इतरांनी पाहिल्याने तणाव पसरला. या प्रकरणी सदर तरूणाच्या विरोधात जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अटकेत आहे. या प्रकरणाचे पडसाद या तरूणाचे मूळ गाव असलेल्या न्हावी ता यावल येथे उमटले. काही तरूणांनी संशयित तरूणाच्या घरावर दगडफेक करून त्याची आई आणि कुटुंबियांना धमकावले.
त्यांना मारहाण करून धमकावण्यात आले. यासोबत त्यांच्या घराबाहेरच्या मोटारसायकलींची तोडफोड देखील करण्यात आली. या प्रकरणी मोमीनवाड्यातील रहिवासी असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दीपक शोभाराम नारवे, विशाल उर्फ पहाडी त्र्यंबक भोगे, तुषार कैलास जिरे, वासुदेव भोगे (पूर्ण नाव माहित नाही) व हर्षल किरण निंबाळकर (उर्फ अंडेवाला) यांच्यासह सुमारे ३० ते ४० अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडला.
या फिर्यादीवरून जमावाच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात हर्षल किरण निंबाळकर उर्फ अंडेवाला याला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, न्हावी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाला सोनवणे, फैजपूर येथील सपोनि निलेश वाघ, सावदा येथील सपोनि जालींदर पळे यांनी भेट दिली. गावात सध्या कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आले असून वातावरण नियंत्रणात आहे. पुढील तपास अंमलदार प्रभाकर चौधरी हे करत आहेत.