आ. मंगेश चव्हाणांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. शनिवारी १५ जुलै रोजी पहिल्या सुनावणीदरम्यान आ. एकनाथराव खडसे यांनी आपला जबाब नोंदविला आहे.
आ. एकनाथ खडसेंनी आ. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल केले. मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने खडसेंचे म्हणणे ऐकून घेतले असून, या खटल्याची आता पुढची सुनावणी सुरू होणार आहे. राजकीय टीकाटिप्पणी करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथराव खडसेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यानंतर खडसेंनी अब्रू नुकसान केली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
मात्र, त्या नोटिसीला आ. चव्हाण यांनी कोणतंही उत्तर न दिल्याने खडसेंनी आता हा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या कामासाठी खडसे शनिवारी न्यायालयात हजर झाले होते. भादंवि कलम ५००आणि ६६ अ अंतर्गत मंगेश चव्हाण यांना अब्रू नुकसान केल्याप्रकरणी शिक्षा व्हावी तसंच ५१ हजार रुपयांचा प्रतिकात्मक स्वरूपात दंडही करावा, अशी मागणी एकनाथराव खडसेंनी न्यायालयाकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.