|| *महावीर वाणी ६* || (७ जुलै 2023)
संसार व भव असे दोन चक्र आहेत. असे म्हणतात की, दुनिया गोल आहे. हे गोल किंवा संसार व भवचक्र भेदणारी व्यक्ती मोक्षास जाते. हे महत्त्वाचे विचार प्रखर वक्ता प. पू. गुलाब गुरुदेव म. सा. यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात चातुर्मास अंतर्गत प्रवचन श्रृंखला सुरू आहे त्यासाठी श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
दुसऱ्याच्या प्रती ‘कोमलता’ दयाभाव ठेवावा असे सांगून, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती प्रतिकूल बनू शकते; अशा वेळी आपला धर्म सोडू नये, मनात शांती ठेवावी याबाबत दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे त्यांनी सांगितले. आपल्याला थोडेच आयुष्य मिळालेले आहे, त्या आयुष्यात आपण मनात वैरभाव ठेवून कर्म का बांधायचे? लटकलेले, भटकलेले आणि चार गतीत अटकलेले त्याचप्रमाणे आधी, व्याधी व उपाधी यातून सुटण्यासाठी आपल्या हृदयात दुसऱ्याच्या प्रति कोमल भाव ठेवावा असे आवाहन व प.पु. गुरुदेव गुलाब मुनी म.सा. यांनी केले.
कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो, आपण चार शरण कधीच सोडू नये. हे ४ शरण सुटू नये यासाठी ‘मंगलपाठ’ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. असे विचार प.पू. कैलाश मुनी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. आपल्याला रात्री झोप येत नसेल तर मनात चांगले विचार धरून स्वतःचे स्वतः मंगलपाठ म्हणणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्याला त्यामुळे शांत झोप लाभते. शुभ विचार करण्याने ५ महत्त्वाचे फायदे त्यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. ते असे की, जुने अशुभ विचार मनातून निघून जातात, नवीन अशुभ विचार येत नाहीत, मनात नवे शुभ विचार येतात, मानसिक वेदना किंवा आजार उद्भवत नाहीत आणि पाचवा लाभ असा की, मन कायम प्रसन्न असते. त्या दृष्टीने मंगलपाठ ऐकणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी उपस्थित सांगितले.
_(स्वाध्याय भवन, जळगाव – दि. ०७/०७/२०२३)_
•शब्दांकन – किशोर कुळकर्णी, प्रसिध्दी विभाग जैन इरिगेशन. जळगाव.•