मुंबई (वृत्तसंस्था) – हाथरस उत्तर प्रदेश येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर हा देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारे नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही? आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
तसेच राहुल गांधी खासदार आहेत. सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसेच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. रक्त सांडले आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना आज दुपारी यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली. त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडलेही होते. आपल्यावर पोलिसांनी लाठीमार करून खाली पाडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांना आणि अन्य कॉंग्रेस कायकर्त्यांना अटक करून नंतर थोड्यावेळाने सोडून देण्यात आले.







