पोलीस, सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी शिरसोलीत संघर्ष करिअर अकॅडमीची स्थापना
बुधवारी होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे संघर्ष करिअर अकॅडमीचे बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पोलीस व सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता संघर्ष अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
शिरसोली गावामध्ये प्रथमच आर्मी व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र निर्माण झाले आहे. जे विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण झाले आहेत, अशांना या संघर्ष अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू झाले आहेत. प्रथम ४० येणाऱ्या विद्यार्थ्यांना ४० टक्के फी मध्ये सवलत देण्यात आली आहे. तसेच अनाथ मुलांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून ३१ सप्टेंबर पासून ५ दिवस प्रवेश नोंदणी राहील्.
संघर्ष करिअर अकॅडमीचे भव्य उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे बुधवारी ६ सप्टेंबर रोजी करणार आहेत. यावेळी परिविक्षाधीन डीवायएसपी आप्पासो पवार, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक जयपाल हिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी शिरसोलीच्या पंचक्रोशीतील तरुणांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन संघर्ष करिअर अकॅडमीचे संस्थापक योगेश राठोड यांनी केले आहे.