पळासखेडे मिराचे येथे कृषी मेळावा संपन्न
जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांमार्फत पळसखेडा येथे ‘समृद्ध शेती’ या विषयावर आयोजित करण्यात आलेला कृषी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कापूस, मका आणि केळी या प्रमुख पिकांच्या आधुनिक व्यवस्थापनावर आधारित या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसखेडा येथील सरपंच आशाताई संजय पवार होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. देवरे, समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, डॉ. प्रीती दातीर आणि उद्यानविद्यातज्ञ प्रा. के. ए. बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी सभापती चंद्रशेखर काळे, मोहाडीचे सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच संदीप काळे आणि प्रगतशील शेतकरी भरतसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना समृद्ध शेतीची संकल्पना समजावून सांगताना विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पीक व्यवस्थापन: कापूस, मका व केळी पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान.
खत व कीड नियंत्रण: संतुलित खत व्यवस्थापन आणि प्रभावी कीड-रोग नियंत्रण उपाय.
शाश्वत शेती: बाजाराभिमुख शेती पद्धती आणि खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे सूत्र.
मार्गदर्शक तुकाराम निकुले, प्रगतशील शेतकरी अनिल चौधरी आणि प्रा. शरद पाटील (जामनेर) यांनी कृषीदूतांना व शेतकऱ्यांना मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषीदूत अमन मोगल, किरण इंगळे आणि ऋषिकेश निळे यांनी ‘समृद्ध शेती’ या विषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन कृषीदूत रोशन नरोडे आणि सिद्धेश जैन यांनी प्रभावीपणे सांभाळले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तर सत्रामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. शेवटी, प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी उपस्थित सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांचे आभार मानले व मेळाव्याचा समारोप झाला.









