जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थिनीं व दोन विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात व्दितीय वर्षातील तीन विद्यार्थिनींनी सहा जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या हेल्पलाइनला ई- मेलव्दारे कळविण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समितीने शुक्रवारी २७ रोजी १५ सदस्यीय समितीने जबाब नोंदविण्याचे काम सुरु केले आहे. यात १०० पेक्षा अधिक जणांचे जबाब घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील व्दितीय वर्षाच्या तीन विद्यार्थिनींनी प्रथम वर्षाच्या चार विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी यांची दि.२५ रोजी रॅगिंग घेतल्याबाबतची तक्रार दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या हेल्पलाइनला ईमेलव्दारे प्राप्त झाली होती. (केसीएन)यानंतर या विभागाने जीएमसीच्या प्रशासनाशी संपर्क साधून झालेला प्रकार लक्षात आणून दिला. त्यानुसार जीएमसीच्या अधिष्ठाता विभागाने पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. गुरुवारी पीडित विद्यार्थिनींनी व दोन विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांची भेट घेऊन रॅगिंग विषयी माहिती दिली. यानंतर रॅगिंग करणाऱ्या तीन विद्यार्थीनींना बोलविण्यात येऊन महिला सहायक पोलीस निरीक्षक यांचेसमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
महाविद्यालयाने चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत महाविद्यालयातील ११ प्राध्यापक असून इतर चौघांमध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, प्राध्यापक यांचा समावेश आहे. या समितीने शुक्रवारी कामकाज सुरु केले असून आतापर्यंत सुमारे ४० जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली.(केसीएन) दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार ६ डॉक्टरांनी त्यांचे रुग्णालयातील कामकाज थांबविले असून ते चौकशी समितीसमोर सोमवारी उपस्थित राहणार आहेत. तर स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात रुग्णालयात तात्पुरती सेवा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील डॉक्टरांना बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.