नाशिक (वृत्तसंस्था) – भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वकील सदावर्ते यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजातील अनेकांची अफजलखानचे वंशज असल्याचे तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पोलीस प्रशासन व राज्य सरकारनं वेळीच कठोर कारवाई करावी, अन्यथा या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी दिला आहे.
दुसरीकडे, कोल्हापूरात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. वकील गुणवंत सदावर्ते यांच्या वक्त्व्याचा निषेध करण्यात आला. छत्रपती घराण्याबद्दल अपशब्द वापरल्यानं कोल्हापूर येथील शिवाजी चौकात शिवप्रेमींचे आंदोलन करण्यात आलं. सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चपलेने मारहाण करण्यात आली. एका कार्यक्रमात सदावर्ते यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे.
पुण्यात छावा संघटनेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत होळी करण्यात आली. असं बेताल वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामधील बहूजन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते. यापूर्वी आम्ही छावा संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्ते यांना समज देण्याची मागणी केली होती. परंतु ते न सुधारता वारंवार समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांना हे माहिती हवे की, छत्रपती संभाजीराजे हे स्वत: छत्रपती शाहू महाराज व राजर्षी छत्रपती महाराज यांचे थेट वंशज आहेत.
तसेच ते लोकशाहीतील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती त्यांनी संभाजीराजेंची नियुक्ती संसदेत केली आहे, त्यामुळे ते लोकप्रतिनिधी देखील आहेत. आणि एका लोकप्रतिनिधी च्या विषयी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलण्याचा अधिकार या सदावर्ते सारख्या थर्ड क्लास व्यक्ती ला कोणी दिला?
लोकशाहीला मानणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज हे होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीराजे यांना (लोकशाहीचा स्तंभ) असे संबोधले आहे. आणि त्याच राजर्षी छत्रपती महाराजांनी डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. त्यामुळे बहूजन समाज त्यातही दलित समाज हा शाहू महाराजांचा भक्त आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, माझी जयंती साजरी करण्यापेक्षा राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करा. असे असताना शाहू महाराजांचे वंशज हे आमच्या मराठ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, मराठा समाजासाठी लढत असताना त्यांची भूमिका ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेला साजेशी आहे आणि संभाजीराजेंचे नेतृत्व केवळ मराठाच नव्हे तर इतर बहूजन जातींनी स्विकारले आहे, ओबीसी व धनगर यांनी स्विकारले आहे. असे असताना गुणरत्न सदावर्ते सारख्या व्यक्तीने संभाजीराजेंबद्दल असे अपशब्द वापरणे आम्ही सहन करणार नाही, त्याबाबत सरकाराने योग्य कार्यवाही करावी नाहीतर पुढे जे होईल त्याला आम्ही जबाबदार नसणार, असा इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आमच्या साठी केवळ महापुरुषच नाहीत तर आमच्यासाठी ते धर्म आहेत, आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशी आमची भूमिका आहे. सदावर्ते ज्या अर्थी मराठा आरक्षणाविरोधात लढले तेव्हा आम्ही काही बोलले नाही, पण आमच्या नेतृत्त्वावर जर कोणी असे बोलत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही, असं छावा संघटनेनं म्हटलं आहे.