जळगावातील समर्थ कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील समर्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघड झाली. घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंदा महेश राठोड (वय १९, रा. समर्थ कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, वडील, २ बहिणी यांच्यासह राहत होती. चंदाचे वडील महेश हे वॉचमनचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. (केसीएन)चंदाने नीट परीक्षादेखील काही महिन्यांपूर्वी उत्तीर्ण केल्ल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, सोमवारी दि. २३ रोजी घरी कोणी नसताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरी चंदाने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
काही वेळाने कुटुंबीय घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एकच हंबरडा फोडला. चंदाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकाचा आक्रोश सुरु होता. चंदाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.